nisarg-wari-banner-2000x968-33.jpg

निसर्ग वारी

प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान

पांडुरंग हरी.. प्लास्टिक, थर्माकोल कचरामुक्त पंढरीची वारी!

wari-2

पंढरीची वारी संतांनी आखून दिलेल्या पर्यावरणपूरक पद्धतीने शेकडो वर्षे सुरु होती. मात्र मागील काही वर्षांत वारीमध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून बनवलेल्या प्लेट्स, ग्लासेस, कप्स यांच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वापरलेल्या या प्लेट्स निसर्गचक्रात विघटन पावत नाहीत. दररोज लाखोंच्या संख्येने वापरलेल्या प्लेट्स तशाच टाकून दिल्या जातात किंवा जाळल्या जातात त्यामुळे हवा, जमीन आणि पाणी यांचे प्रचंड प्रदूषण होते. खरकट्या डिशेस खाल्ल्यामुळे शेकडो जनावरे मरण पावतात. प्लॅस्टिक आणि थर्माकोल डिशेस मध्ये गरम पदार्थ वाढल्यामुळे त्यातील कर्करोगजन्य रसायने अन्नात मिसळले जातात. हे टाळण्यासाठी नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या पत्रावळींचा वापर पुन्हा सुरु करणे हा एकच मार्ग उपलब्ध आहे. वारकऱ्यांनी वारीमध्ये पानांपासून बनवलेल्या पत्रावळींचा वापर करावा यासाठी प्रबोधानासह विविध स्तरांवर थं क्रिएटीव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच कार्य करीत आहे. मागील वर्षापासून कमिन्स इंडिया फौंडेशन च्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. वारकरी संप्रदायातील चाळीस ह. भ. प. महाराजांचा, दिंडीप्रमुखांचा अभियानात सक्रीय सहभाग मिळत असून वारीमार्गात असलेल्या गावांतील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांचे प्रदूषण मुक्तीसाठी प्रबोधन करण्यात आले आहे.

प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेसच्या तुलनेत पानांच्या पत्रावळींची किंमत अधिक असल्याने दिंडीचालक प्लास्टिक आणि थर्माकोलच्या डिशेसना प्राधान्य देतात ही अडचण सोडविण्यासाठी थं क्रिएटीव्हने समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, अन्नदान करणाऱ्या संस्था, पत्रावळींचे विक्रेते आणि दिंडीचालक यांच्या समन्वयातून वारकऱ्यांना सवलतीच्या दरात नैसर्गिक पानांच्या पत्रावळी उपलब्ध होण्यासाठीची रचना उभी केली आहे. अशा पद्धतीने २०१८  साली २५ लाख पत्रावळी उपलब्ध करून दिल्या होत्या. २०१९ सालच्या वारीमध्ये एक कोटी पत्रावळी वारीमध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या.

अभियानाची उद्दिष्ट्ये
 

  • प्रदूषणकारक आणि मानवी आरोग्यास घटक असलेल्या प्लॅस्टिक आणि थर्माकोल प्लेट्स ऐवजी नैसर्गिक पानांच्या पत्रावळी वापरण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करणे.
  • नैसर्गिक पानांच्या पत्रावळी सवलतीच्या दरात उपलब्ध होण्यासाठी विक्रेते, दिंडीचालक आणि दानशूर मंडळी यांचा समन्वय साधणे.  
  • वापरलेल्या पत्रावळींवर सेंद्रिय प्रक्रिया करून त्यांचे कंपोस्ट खत तयार करून ते वारीमार्गातील शेतकऱ्यांना वितरीत करणे. 
  • प्रसाद तसेच दर्शनासाठी पान-फुल नेण्यासाठी प्लास्टिक कॅरी बॅग ऐवजी कापडी पिशव्या नेण्यासाठी नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे, भक्तांचे वारीपूर्व काळात प्रबोधन करणे. 

पर्यावरणाचे रक्षण आपण स्वतः करू इतरांचे प्रबोधन करू

प्रबोधनातून समाजपरिवर्तन हीच संतांची शिकवण आहे. ही शिकवण आपण आचरणात आणू, इतरांचे प्रबोधन करू, मनपरिवर्तन करू. साधे-सोपे उपाय अमलात आणू आणि पर्यावरणाचे संवर्धन, रक्षण करू.

मार्गदर्शक मंडळ

  • मा. डॉ. श्री नितीन करमळकर 
    कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • मा. डॉ. श्री देवानंद शिंदे
    कुलगुरू शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
  • मा. डॉ. मृणालिनी फडणवीस,
    कुलगुरू सोलापूर विद्यापीठ 
  • ह. भ. प. श्री अभयजी टिळक, प्रमुख विश्वस्त श्रीज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी, श्रीक्षेत्र आळंदी
  • ह. भ. प. श्री चैतन्यमहाराज देगलूरकर, सदस्य श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर
  • ह. भ. प. श्री शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर, ज्येष्ठ आचार्य, वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र आळंदी 
  • ह. भ. प. श्री प्रसादमहाराज अमळनेरकर,
    संत श्रीसखाराम महाराज संस्थान अमळनेर 
  • मा. सुवर्णलताताई भिशीकर,
    संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका 
  • ह. भ. प. श्री देवदत्त उर्फ राणा महाराज वासकर, वारकरी पाईक संघ श्रीक्षेत्र पंढरपूर
  • मा. श्री गोपाळराव गोसावी,  संत श्रीसोपानकाका देवस्थान श्रीक्षेत्र सासवड
  • ह. भ. प. श्री संजयमहाराज धोंडगे, संत श्रीनिवृत्तीनाथ पालखी सोहळा, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर 
  • मा. श्री रवींद्र पाटील,  संत श्रीमुक्ताबाई दिंडी प्रमुख श्रीक्षेत्र मुक्ताईनगर 
  • ह. भ. प. श्री चारुदत्त आफळे महाराज, सदस्य
    श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर 

प्लास्टिक, थर्माकोल डिशेस आणि प्लास्टिक फॉईल कोटेड प्लेट्समध्ये गरम अन्न खाल्ल्याने कर्करोगाचा धोका आहे

वारीच्या दरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी लाखो थर्माकोल आणि प्लास्टिक डिशेस वापरल्या जातात. नंतर त्या तशाच टाकून दिल्या जातात. वारीमार्गावरील आपल्याच बांधवांची शेते, विहिरी यामुळे प्रदूषित होत आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोल यांचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचे गंभीर नुकसान यामुळे होते आहे.  

वारीतून आणि इतर कार्यक्रमांतून प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेश हद्दपार करू!

वारीच्या दरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी लाखो थर्माकोल आणि प्लास्टिक डिशेस वापरल्या जातात. नंतर त्या तशाच टाकून दिल्या जातात. वारीमार्गावरील आपल्याच बांधवांची शेते, विहिरी यामुळे प्रदूषित होत आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोल यांचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचे गंभीर नुकसान यामुळे होते आहे. 

पानांपासून बनलेल्या पर्यावरणस्नेही द्रोण पत्रावळी यांचा वापर करू !

पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोण निसर्गाचाच भाग असलेल्या पानांपासून बनवल्या जातात. काही दिवसांतच त्यांचे विघटन होते. त्यांच्यापासून पर्यावरणास कसलीही हानी पोचत नाही.   

माउली आणि तुकोबांच्या दर्शनाला जाताना कॅरीबॅग ऐवजी पानात बांधून फुले नेऊ!

वारीमध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी जाताना पानफुल नेण्यासाठी प्लास्टिक कॅरीबॅग वापरतात. त्याऐवजी पानात नेल्यास दररोज लाखो पिशव्यांपासून होणारे दीर्घकालीन अनिष्ट परिणाम करणारे प्रदूषण टाळले जाईल.   

वारी मध्ये भोजनासाठी स्टीलच्या ताट-वाटी ऐवजी द्रोण पत्रावळी वापरू

प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेश ऐवजी भोजनासाठी स्टीलच्या ताट वाट्या वापरण्याकडे काहींचा कल आहे. मात्र वारीमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने वापरलेल्या स्टीलच्या ताट वाट्या धुण्यासाठी टैंकरने पुरावालेल्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. सोबत डिटर्जन्ट मुळे प्रदूषणही होते.   

'निसर्ग वारी' प्रबोधनाची
सक्रिय पर्यावरण संवर्धनाची

पर्यावरण हाच जीवनाचा मूळ आधार आहे. मानवाने पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण केले तरच पर्यावरण आपले करेल हा निसर्गाचा मुलभूत नियम आहे. मानवाची गेल्या काही दशकातील वाटचाल पहिली तर हा नियम धाब्यावर बसवून मानवजात स्वतःचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे अतोनात नुकसान करीत आहे असे दिसते. प्रबोधनातूनच समाज परिवर्तन होते हे भारतीय संत महात्म्यांनी त्यांच्या आचरणातून वारंवार सिध्द करून दाखवले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली देहू-आळंदी ते पंढरपूर वारी हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. शेकडो वर्षे पर्यावरणस्नेही असलेली वारी गेल्या काही वर्षात बरीच बदलेलेली आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेस आणि प्लेट्स यांचा अनिर्बंध वापर हा ठळक आणि विघातक बदल. वारीच्या दरम्यान आणि वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने होत असलेल्या प्लास्टिक, थर्माकोल यांच्या प्लेट्स, डिशेस यांच्या प्रचंड वापरामुळे शेती, जमीन, पाणी आणि पर्यावरण साखळी यांचे दीर्घकालीन नुकसान होते आहे. आजवर झालेली हानी भरून काढण्यासाठीच शेकडो वर्षे लागतील एवढे हे भीषण संकट आहे. 

जे-जे अमंगल, अनिष्ट त्यावर वार करून, त्याच्या जोखडातून स्वतः मुक्त होणे आणि त्यासाठी समाजाचे प्रबोधन करणे हे कार्य वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षे केले आहेच. सांप्रतकाळी प्लास्टिक आणि थर्माकोल प्लेट्स, डिशेस यांच्या रूपाने शेकडो वर्षे जिवंत राहणारा भस्मासुर वारीमध्ये शिरला आहे. दिवसें-दिवस तो आपले पाश आवळत चालला आहे. आपले आणि येणाऱ्या आपल्याच पिढ्यांचे या भस्मासुरापासून रक्षण करण्यासाठी आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी वारकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांचे प्रबोधन संतानी घालून दिलेल्या मार्गाने करणे हाच एकमेव रामबाण उपाय आहे. 

प्रबोधनाची त्रिसूत्री

प्रबोधन वारकऱ्यांचे

देहू-आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांचे प्रबोधन आजवर केले गेले आहे. वारकरी हा मुळातच शेतकरी आणि निसर्गावर अवलंबून असल्याने पर्यावरण संवर्धन हे त्याच्या रक्तातच असते. प्लास्टिक आणि थर्माकोल मुळे पर्यावरणाची हानी होते हे समजल्यानंतर नैसर्गिक पानांच्या पत्रावळी जेवणासाठी वापरण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. थं क्रिएटिव ने गेल्या काही वर्षात हाती घेतलेल्या प्रबोधन, जनजागरण मोहिमेचे हे मोठे यश आहे. या उपक्रमात विविध दिंड्यांचे प्रमुख, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, माध्यमे, समाजसेवक यांचेही सक्रीय सहकार्य लाभले. 

प्रबोधन विद्यार्थ्यांचे

आजचा विद्यार्थी हा संवेदनशील, संस्कारक्षम नागरिक आहे. निकट भविष्यात देशाची सूत्रे हाती घेणाऱ्या या कार्यशील तरुण पिढीला पर्यावरण रक्षणाचे महत्व आताच पटवून देणे ही काळाची गरज आहे. थं क्रिएटिव ने वारी मार्गातील गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये जाऊन तरुण विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आजवर एक लाख  विद्यार्थ्यांनी प्लास्टिक, थर्माकोल यांचा कमीतकमी वापर करण्याची शपथ घेतली आहे. थं क्रिएटिव च्या भविष्यातील उपक्रमाचे शिलेदारही यातून घडले जात आहेत. आपल्या घरी आणि गावात पर्यावरण संवर्धनाचा संदेश हे विद्यार्थी प्रभावीपणे घेऊन जात आहेत.   

प्रबोधन नागरिकांचे

प्लास्टिक, थर्माकोल कचरा आणि त्यापासून होणारे  घातक प्रदूषण ही समस्या केवळ वारीच्या दरम्यानची नसून वर्षभरातील आहे. गावांमध्ये, शहरांमध्ये राहणारे नागरिक असा कचरा वर्षभर निर्माण करत असतात. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू कमीतकमी वापराव्यात आणि त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानमाला, चर्चासत्रे, प्रदर्शने, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी या सर्व माध्यमांचा प्रभावी वापर यासाठी केला जातो. थं क्रिएटिवचे संस्थापक श्री प्रशांत अवचट यांनी आजवर पाचशेहून अधिक व्याख्याने यासाठी  दिली आहेत.    

माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री मा. श्री प्रकाशजी जावडेकर यांचे मनोगत

थं क्रिएटिव ने आयोजीत केलेल्या प्लास्टिक कचरा मुक्त भारत अभियानात केंद्रीय केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री मा. श्री प्रकाशजी जावडेकर यांनीही सहभाग घेतला. त्या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत.

पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.

निसर्ग वारी उपक्रमामध्ये तन मन धनाने सहभागी होऊया

फोटो आणि व्हिडीओ गॅलरी

प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियानात सहबागी होऊन पर्यावरण रक्षणासाच्या या जनअभियानात आपणा सर्वांच्या सक्रीय योगदानाची आवश्यकता आहे

  • वारी कालावधी मध्ये तसेच वर्षभर सुरु असलेल्या विविध उपक्रमांमध्ये आपण म्हणून सहभागी होऊ शकता (वारी काळात कमीत कमी ३ दिवस ते २० दिवसांपर्यंत 
  • आपण आपल्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक संस्थेसह अभियानात सहभागी होऊन आपल्या कडे असलेल्या विशेष ज्ञानाचे, कौशल्याचे योगदान अभियानासाठी देऊ शकता 
  • आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींच्या स्मरणार्थ अभियानासाठी आर्थिक योगदान देऊ शकता. त्यासाठी बँक खात्याचे तपशील खालील प्रमाणे  

STATE BANK OF INDIA,  BRANCH: SHIRUR GHODNADI

Name of Account:  THUM CREATIVE PARYAVARAN DAKSHATA KRUTI MANCH
Acc.No: 36390032698   IFSC: SBIN0000279

संपर्क 

निसर्गवारी

1435, हुडको कॉलनी, शिरूर घोडनदी. जि. पुणे 412210

मोबाईल क्र.
प्रशांत अवचट: 9423579680, राजेंद्र अनारसे: 9975027173

Copyright | All rights reserved | निसर्गवारी | Designed By e-brochure.in